State Excise Sub Inspector
State Excise Sub Inspector
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क प्रशिक्षण
राज्य उत्पादन शुल्क विभागातील नवनियुक्त दुय्यम निरीक्षकांचे 92 दिवसाचे मूलभूत प्रशिक्षण दिनांक 8 नोव्हेंबर 2021 पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण दि 22 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत सुरू राहणार आहे. सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन श्री प्रसाद सुर्वे, विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग पुणे तथा समन्वय अधिकारी यांच्या हस्ते दि 8 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आले. सदर उद्घाटन कार्यक्रम श्री शशिकांत बोराटे, प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा तसेच डॉ श्री अभिजीत पाटील, उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. सदर प्रशिक्षणादरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील एकूण 113 दुय्यम निरीक्षकांना 92 दिवसाचे मूलभूत प्रशिक्षण पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा याठिकाणी देण्यात येत आहे. सदर मूलभूत प्रशिक्षणामध्ये बाह्य वर्ग प्रशिक्षण व आंतरवर्ग प्रशिक्षण असे प्रशिक्षणाचे मुख्यत्वे दोन भाग आहेत. बाह्य वर्ग प्रशिक्षणामध्ये पीटी, ड्रिल, वेपन ट्रेनिंग, फायरिंग याचा मुख्यत्वे समावेश आहे. आंतरवर्ग प्रशिक्षणामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षक यांचेकडून विविध विषयाचे कायदेविषयक ज्ञान तसेच तपास कसे करावे, कायदा व सुव्यवस्था , तपास करत असताना अवलंबावयाची कायदेशीर प्रक्रिया याबाबतचे इत्यंभूत ज्ञान प्रशिक्षणार्थी यांना देण्यात येते.
सदर प्रशिक्षणादरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामाचा अनुभव असलेले निवृत्त अधिकारी यांना तज्ज्ञ व्याख्याते म्हणून पाचारण करण्यात येते व त्यांच्यामार्फतदेखील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात येते. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणाचा भाग म्हणून विविध शुगर फॅक्टरीज, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट लिमीटेड मांजरी पुणे, पोलीस स्टेशन, कारागृहे वगैरे ठिकाणी प्रशिक्षणार्थी च्या भेटी देखील आयोजित करण्यात येतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दुय्यम निरीक्षक यांना यापूर्वी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात येत होते. सदर ठिकाणी प्रशिक्षणाच्या एकूण पाच बॅचेस झालेल्या आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील दुय्यम निरीक्षकांची ही पहिलीच बॅच प्रशिक्षण घेत आहे.